नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी मुंबईतील अनेक विभागांचा पाणीपुरवठा तब्बल १० तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मुख्य जलवाहिन्यांवरील विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत.
कोणत्या भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद?
या देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खालील विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
- बेलापूर विभाग : बेलापूर सेक्टर २४ परिसरातील जलवाहिनीवरील इनलेट बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम.
- नेरूळ विभाग : सानपाडा सेक्टर ३० येथील सानपाडा प्रेसजवळील मुख्य जलवाहिनीवरील स्लुईस व्हॉल्व्ह बसविण्याचे काम.
- वाशी विभाग : वाशी सेक्टर २२ येथील जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम.
- वाशी सेक्टर १९ : मोरबे मुख्य जलवाहिनीवरील ७०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहे.
- बेलापूर सेक्टर २४ : पाटणकर मैदान परिसरातील ७०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर इनलेट बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविण्याचे काम.
- बेलापूर सेक्टर १५ : किल्ला जंक्शन परिसरातील १०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बसविण्याचे काम.
- शिरवणे गाव : ६०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर ४ फ्लोमीटर बसविण्यात येणार आहेत.
या विभागांनाही बसणार पाणीबंदचा फटका
मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांमधील संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठादेखील बंद राहणार असल्याचे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.
४ नोव्हेंबरला कमी दाबाने पाणीपुरवठा
दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. मात्र, सुरुवातीला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
दहा तासांच्या पाणीबंदमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक तेवढा पाणीसाठा आधीच करून ठेवावा. पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे.
महत्त्वाचे : पाणीपुरवठा बंद – मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ | वेळ – सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.
स्रोत : नवी मुंबई महानगरपालिका – प्रसिद्धीपत्रक.






Leave a Reply