नवी दिल्ली : संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation Bill) विरोध करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या विधेयकामुळे लोकसभेतील जागांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी वाढून जवळपास ८५० होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावित विधेयकात महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि नव्या आकडेवारीच्या आधारे लोकसभा मतदारसंघांच्या सीमा पुनर्निश्चित करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राज्यांच्या लोकसभा जागांचे प्रमाण १९७१ च्या जनगणनेच्या आधारे कायम ठेवण्याच्या मुद्द्यामुळे या प्रक्रियेवर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’चे सह-संयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मतदारसंघांच्या सीमा राजकीय फायद्यासाठी बदलल्या जाण्याचा म्हणजेच ‘Gerrymandering’ चा धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांनी या विधेयकाबाबत सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचे पक्षाने सांगितले आहे. राजकीय पक्षांनी तात्कालिक राजकीय फायद्यापेक्षा देशाच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य द्यावे आणि या विधेयकाला विरोध करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विधेयकाला समर्थन देणाऱ्या किंवा जनहिताच्या मुद्द्यांवर भूमिका बदलणाऱ्या पक्षांना जनतेसमोर उत्तरदायी धरले जाईल, असा इशाराही ‘कॉकरोच जनता पार्टी’ने दिला आहे. त्यामुळे आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.












Leave a Reply