मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमधील अंतर्गत वादाची चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता सोशल मीडियावरही पोहोचला आहे. धंगेकर यांनी नवनाथ बन यांना उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
धंगेकरांची व्यंगचित्रासह पोस्ट
रवींद्र धंगेकर यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवर भाजप कार्यालयाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीकडून कुत्र्याला पाव खाऊ घातले जात असल्याचे व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या चित्रासोबत त्यांनी नवनाथ बन यांच्यावर टीका करताना लिहिले की,
“ही याची लायकी आणि चालला धंगेकरांशी पंगा घ्यायला चालला…!! अरे बेट्या, तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाहीत आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला.”
या पोस्टसोबत त्यांनी #बनश्वान, #चिल्ला_पुकार आणि #Paid_Animal असे हॅशटॅग वापरले आहेत.
नवनाथ बन यांच्या टीकेनंतर वादाला सुरुवात
या वादाची सुरुवात विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमधून झाली. नवनाथ बन यांनी धंगेकर यांच्यावर टीका करताना त्यांच्या राजकीय पक्षबदलाचा संदर्भ दिला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याच्या त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते.
बन यांच्या या वक्तव्यानंतर धंगेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले.
नवनाथ बन यांचाही व्यंगचित्रातून पलटवार
धंगेकर यांच्या पोस्टनंतर नवनाथ बन यांनीही सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. त्यांनी धंगेकर यांचा चेहरा असलेल्या रंग बदलणाऱ्या सरड्याचे व्यंगचित्र पोस्ट केले. या पोस्टसोबत त्यांनी ‘काय म्हणतात पुणेकर, रंग बदलू धंगेकर!’ असा टोला लगावला.
त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वादाला सोशल मीडियावर आणखी धार आली आहे.
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांकडून एकमेकांवर होत असलेल्या टीकेमुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांच्यासह पक्षातील नेत्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे वृत्तही समोर आले आहे.
एकीकडे राज्यातील राजकीय समीकरणे आणि महायुतीतील समन्वयाचा प्रश्न चर्चेत असताना, दुसरीकडे नेत्यांमधील सोशल मीडिया वॉरमुळे राजकीय वातावरण तापले आहे.






Leave a Reply