Sponsored

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती आणि त्यांच्या अपघाताच्या तपासाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात राज्य सरकार आणि संबंधित नेत्यांना काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले आहेत.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या नावाने पुणे रिंगरोडचे नामकरण करण्याची मागणी केली आहे. केवळ पुतळा उभारून अजितदादांचे योगदान मर्यादित करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

पुणे जिल्हा परिषदेकडून पुतळा उभारल्याबद्दल आभार

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषदेत सत्ता असलेल्या आणि अजितदादांना मानणाऱ्या नेत्यांनी त्यांचा पुतळा उभारला, याबद्दल त्यांचे आभार. मात्र, अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी सुमारे दशकभरापेक्षा अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले.

AdvertisementAds

अशा परिस्थितीत अजितदादांचे नाव एखाद्या मोठ्या विकासप्रकल्पाला देण्याऐवजी त्यांचे योगदान केवळ पुतळ्यापुरते मर्यादित ठेवण्यामागे काही व्यक्तींची भूमिका आहे का, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पुणे रिंगरोडला अजितदादांचे नाव देण्याची मागणी

पुणे रिंगरोडला अजित पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. पुतळ्याच्या अनावरणापलीकडे जाऊन त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहील, असा निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.

यासोबतच अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अन्यथा पुण्यतिथीच्या दिवशी आंदोलनाचा इशारा

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट इशारा दिला आहे की, अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणापुरतेच त्यांचे कर्तृत्व मर्यादित न ठेवता पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देण्याची आणि अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची घोषणा करण्यात यावी.

अन्यथा अजितदादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पुणे रिंगरोडला त्यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या घातपात की अपघात या संदर्भातील सत्य जाणून घेण्याचे आमचे प्रयत्नही सुरूच राहतील, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:
error0
fb-share-icon20
Tweet 20
fb-share-icon20
Sponsored