Sponsored

खरगोन / जळगाव : मध्य प्रदेशातील खरगोन परिसरात शनिवारी (१४ नोव्हेंबर) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे सौम्य हादरे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, भुसावळ आणि परिसरातील काही भागांतही जाणवल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक जाणवलेल्या कंपनांमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ९.१५ ते ९.२० च्या सुमारास काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवले. मध्य प्रदेशातील खरगोन येथे भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल असल्याचे वृत्त आहे. या धक्क्यांमुळे काही ठिकाणी घरांच्या खिडक्या, कपाटे आणि इतर वस्तू हलल्याचा अनुभव नागरिकांनी सांगितला.

जळगाव जिल्ह्यातही नागरिकांना जाणवले धक्के

AdvertisementAds

खरगोनमधील भूकंपाचे पडसाद जळगाव जिल्ह्यातील काही भागांतही जाणवल्याचे नागरिकांच्या प्रतिक्रियांमधून समोर आले आहे. मुक्ताईनगरसह भुसावळ आणि जळगाव परिसरातील काही नागरिकांनी काही सेकंदांसाठी कंपन जाणवल्याचे सांगितले. काहींना घरातील वस्तू हलल्याचा अनुभव आला, तर काही नागरिकांना सुरुवातीला नेमके काय घडले याचा अंदाज आला नाही.

जीवितहानीचे वृत्त नाही

खरगोन परिसरातील भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त सध्या समोर आलेले नाही. परिस्थितीबाबत अधिकृत यंत्रणांकडून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित मोकळ्या जागेत जावे किंवा मजबूत टेबलाखाली आसरा घ्यावा. तसेच अफवा आणि अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये.

महासंवाद आवाहन : जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ किंवा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्यास नागरिकांनी आपला अनुभव कळवावा

Please follow and like us:
error0
fb-share-icon20
Tweet 20
fb-share-icon20
Sponsored