प्रवाशांची लूट रोखण्यासाठी परिवहन विभाग ॲक्शन मोडमध्ये; तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल सुविधा उपलब्ध
ठाणे | महासंवाद
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना खासगी ट्रॅव्हल्स बस कंपन्यांकडून मनमानी भाडे आकारणी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी आणि त्यांना होणारा अनावश्यक त्रास टाळण्यासाठी कल्याण RTO कडून १ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
मनमानी भाडेवसुली करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाईचा इशारा
दिवाळीच्या काळात खासगी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून अनेकदा नियमित भाड्यापेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. विशेषतः सणासुदीच्या गर्दीचा फायदा घेत काही बस कंपन्या प्रवाशांकडून अवाजवी भाडे वसूल करतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने प्रशासकीय पातळीवर विशेष तपासणी अभियान हाती घेतले आहे.
या मोहिमेअंतर्गत खासगी ट्रॅव्हल्स बस ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या सर्व ठिकाणी किलोमीटरनुसार पूर्ण बससाठी आकारण्यात येणारे कमाल भाडे, प्रति आसन दर तसेच प्रवाशांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल आयडी दर्शविणे संबंधित खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
नियमबाह्य पद्धतीने भाडेवसुली करणाऱ्या खासगी बस कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी निर्धारित भाड्याची माहिती घ्यावी आणि जादा भाडे आकारले जात असल्यास तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा
खासगी बसकडून जादा भाडे आकारणी होत असल्यास प्रवाशांना खालील माध्यमांतून तक्रार नोंदविता येणार आहे.
- दूरध्वनी: 0251-2230505
- दूरध्वनी: 0251-22308888
- ई-मेल: dyrto.04-mh@gov.in
तक्रार नोंदविताना प्रवाशांनी बसचा नोंदणी क्रमांक, प्रवासाचा दिनांक, वेळ, ठिकाण तसेच प्रत्यक्ष आकारलेले भाडे आणि तुलनेत आकारण्यात आलेल्या तिकिटाच्या भाड्याचा योग्य तपशील द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. आशुतोष बारकुल यांनी प्रवाशांना ही माहिती देत जादा भाडे आकारणीविरोधात तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे.
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी परिवहन विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे खासगी बस कंपन्यांच्या मनमानीला कितपत आळा बसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






Leave a Reply