व्यसनमुक्ती व जनजागृती कार्याची दखल; जानेवारी २०२७ मध्ये मेहकर येथे होणार पुरस्कार वितरण
दरेगाव, जि. बुलढाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील दरेगाव येथील राधेश्याम बंगाळे यांची राज्यस्तरीय ‘न्यायहक्क समताशाही समाजरत्न पुरस्कार २०२७’ साठी निवड करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेले कार्य, गावात राबविलेल्या जनजागृती मोहिमा आणि नशामुक्त समाजनिर्मितीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील मारुती पेठ येथील लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. संस्थेचे मुख्य प्रवर्तक अशोक शेजुळ आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य कवी अनिल भगवान चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजी राधेश्याम बंगाळे यांना निवडीचे पत्र प्रदान केले.
राधेश्याम बंगाळे यांनी मागील चार वर्षांपासून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सक्रियपणे कार्य केले आहे. व्यसनांचे दुष्परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तरुणांमध्ये नशामुक्तीबाबत जागृती निर्माण करणे, तसेच विविध जनजागृती मोहिमा आणि शिबिरांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दैनिक न्यायहक्क समताशाही व साप्ताहिक जानेफळ एक्सप्रेस यांच्या वर्धापन दिनानिमित्त जानेवारी २०२७ मध्ये मेहकर येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
राधेश्याम बंगाळे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन
बुलढाणा जिल्ह्यातील दरेगाव येथील राधेश्याम बंगाळे यांच्या सामाजिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात असून, पुढील सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
व्यसनमुक्त आणि जागरूक समाज घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या राधेश्याम बंगाळे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.













Leave a Reply