बुलढाणा प्रतिनिधी | महा संवाद
साखरखेर्डा : मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले तरी त्याचा चुकीचा किंवा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया, व्यसन, ऑनलाइन फसवणूक आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
लोकसेवा आयुर्वेदिक नशामुक्ती केंद्र, साखरखेर्डा यांच्या पुढाकारातून आणि केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार आहे. ५ ऑक्टोबर २०२६ पासून अभियानाला सुरुवात होणार आहे.
या अभियानादरम्यान शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव, चुकीच्या ऑनलाइन संपर्कापासून सावध राहणे आणि व्यसनांपासून दूर राहणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण होणारे अनोळखी संपर्क, प्रेमसंबंध आणि त्यातून उद्भवणाऱ्या संभाव्य फसवणुकीच्या घटनांबाबतही विद्यार्थ्यांना सावध केले जाणार आहे. विशेषतः मुलींनी कोणत्याही व्यक्तीवर ऑनलाइन माध्यमातून सहज विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद परिस्थिती आल्यास पालक किंवा शिक्षकांशी संवाद साधावा, याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
तसेच ऑनलाइन माध्यमातून अमली पदार्थांशी संबंधित संपर्क किंवा माहिती उपलब्ध होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गांजा, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश दिला जाणार आहे.
या अभियानासाठी राधेश्याम बंगाळे यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये अभियान राबविण्यासाठी मुख्याध्यापक ठाकूर सर, कुले सर आणि भावसार सर यांच्याशीही चर्चा करण्यात आली आहे.
अभियानादरम्यान ठाणेदार युवराज रबडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करताना विद्यार्थ्यांनी स्वतःची सुरक्षितता जपावी, व्यसनांपासून दूर राहावे आणि कोणत्याही संशयास्पद ऑनलाइन संपर्काची माहिती पालक, शिक्षक किंवा पोलिसांना द्यावी, असा संदेश या अभियानातून देण्यात येणार आहे.













Leave a Reply